
छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.) : अलीकडच्या काळात महत्त्व वाढलेल्या ‘मानसशास्त्र’ विषयाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मानसशास्त्र विभागाने शहरातील विविध संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना आता स्वयंसेवी संस्था, मानसोपचार रुग्णालये आणि समुपदेशन केंद्रांमध्ये काम करता येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नऊ संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला.
मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात ‘एईडी’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून एम.ए. मानसशास्त्र तसेच ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’ पदविका कोर्सही उपलब्ध आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून ‘रिहॅबिलिटेशन सायकॉलॉजी’ आणि ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’ या विषयांतील चार नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
या कराराच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक यांच्यात आदान-प्रदान होणार असून विद्यार्थ्यांना आठ सत्रांपैकी तीन सत्रांची इंटर्नशिप संबंधित संस्थांमध्ये पूर्ण करता येणार आहे. विशेषतः बी.ए. मानसशास्त्र (एईडीपी) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
कार्यक्रमास कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळून मानसिक आरोग्य क्षेत्रात अधिक सक्षम व्यावसायिक तयार होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis