
नवी दिल्ली, २० एप्रिल (हिं.स.) : अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर झद्रान सध्या एका गंभीर आणि दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. त्याला दिल्लीतील एका रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. झद्रानला 'हेमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस' नावाच्या जीवघेण्या आजाराचे निदान झाले आहे. या आजारामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. शरीरात अतिरिक्त सूज आणि संसर्ग निर्माण होतो.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याची प्रकृती प्रथम खालावली, त्यानंतर अफगाण डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी भारतात येण्याचा सल्ला दिला होता. जानेवारी महिन्यात तो दिल्लीत दाखल झाला, जिथे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या काळात त्याची पत्नी आणि माजी कर्णधार, असगर अफगाण, त्याच्यासोबत होते. त्याचा धाकटा भाऊ, घमाई झद्रान याने सांगितले की, सुरुवातीला संसर्ग गंभीर होता आणि क्षयरोगासह इतर संसर्ग त्याच्या संपूर्ण शरीरात पसरला होता, अगदी मेंदूपर्यंत पोहोचला होता.
उपचारानंतर, त्याच्या प्रकृतीत काही काळ सुधारणा झाली आणि त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, परंतु नंतर त्याला पुन्हा संसर्ग झाला. जेव्हा त्याला डेंग्यू झाला तेव्हा त्याची प्रकृती अधिकच खालावली, ज्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत झाली. मार्च महिन्याच्या अखेरीस केलेल्या बोन मॅरो चाचणीत असे दिसून आले की तो हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिसच्या चौथ्या टप्प्यात आहे. तो सध्या खूप अशक्त आहे आणि त्याचे अंदाजे १४ किलो वजन कमी झाले आहे. त्याच्या भावाच्या म्हणण्यानुसार, तो जास्त बोलू शकत नाही आणि बहुतेक वेळ झोपलेला असतो.
क्रिकेट जगताकडूनही त्याला सतत पाठिंबा मिळत आहे. राशिद खान, असगर अफगाण आणि हशमतुल्ला शाहिदी यांच्यासह अनेक खेळाडूंनी त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले आहे आणि ते त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसह अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनीही त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. त्याच्या कुटुंबीयांना आशा आहे की, अलीकडेच सुरू झालेल्या स्टिरॉइड उपचारामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होईल आणि तो या कठीण काळातून बाहेर पडेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे