
नाशिक, 20 एप्रिल (हिं.स.) : नाशिकच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील (टीसीएस) धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. निदाने नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो कोर्टाने सोमवारी फेटाळून लावला असून याप्रकरणी पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे.
निदा खानने तिच्या 8 आठवड्यांच्या गर्भावस्थेचा हवाला देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तिच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसाठी कमाल शिक्षा 3 वर्षांची आहे, त्यामुळे तिला अटकेपासून संरक्षण मिळावे. जिल्हा न्यायाधीश के.जी. जोशी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तिला कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने पोलिसांना आणि तक्रारदाराला या याचिकेवर आपले म्हणणे मांडण्यासाठी २७ एप्रिल २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे.
निदा खानवर एका 23 वर्षीय महिला कर्मचाऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आणि हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या मते, ती या संपूर्ण रॅकेटची 'मास्टरमाइंड' असून 18 ते 25 वयोगटातील तरुणींना लक्ष्य करणारी टोळी चालवत होती.या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना आरोपी करण्यात आले असून, त्यापैकी 7 जणांना अटक झाली आहे. निदा खान अद्याप फरार असून, विशेष तपास पथक (एसआयटी) तिचा शोध घेण्यासाठी छापेमारी करत आहे. दरम्यान टीसीएसने या प्रकरणाची
दखल घेत निदा खानला तातडीने निलंबित केले आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी