
अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.)।
वरूड तालुक्यातील जरुड गावात रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले असून काही कुटुंबे बेघर झाली आहेत. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरील छप्परे उडून गेली, तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रभावित कुटुंबांना तातडीने मदतीची गरज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी नुकसानाचे प्रमाण मोठे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.दरम्यान, वादळी वाऱ्याचा परिणाम वरूड-अमरावती महामार्गावरही दिसून आला. रस्त्यावर झाडे पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना योग्य ती आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, आपत्तीग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी ग्रामस्थ करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी