
लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)।
नांदेड-जांब-जळकोट- उदगीर-
तोगरी पुढे गुलबर्गा हा एनएच ५० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जळकोटकरांना नांदेड टप्प्यात आलेले आहे, असे असले तरी पूर्वी जसे या रस्त्यावर जसे वळण होते तसेच वळण आजही कायम आहे. हा राष्ट्रीय महामार्ग आता अपघात मार्ग बनला आहे.
नांदेड- जांब-जळकोट उदगीर
तोगरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम झालेले आहे, नांदेड ते उदगीर असा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे या महामार्गावरील गावांचा कायापालट झाला आहे. जळकोट सारखे अनेक गावे राष्ट्रीय महामार्गावर आली.
वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात
जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक, दिग्रस खु येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नासवर गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर धोकादायक वळण आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेगही अधिक असतो आणि या ठिकाणी चक्क यु टर्न आहे. यामुळे वाहन चालवताना या ठिकाणी गाडीवर अनेक वेळा ताबा राहत नाही त्यामुळे एकतर गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी होत आहे किंवा समोरासमोर धडक होत आहे. तसेच अनेक वेळा समोरील वाहनाचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात झाल्यामुळे या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.
त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचा फायदा नक्कीच अनेक गावांना होत आहे. हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे या एन एच ५० वर वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्ता मोठा आणि रुंद झाल्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी होईल असे वाटत असताना आता अपघाताचे
प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
उस्माननगर ते जळकोट एका कंत्राटदारामार्फत तर जळकोट ते तोगरी एका कंत्राटदारामार्फत असे दोन विभाग करून कामे सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम झालेले आहे. या मार्गावरील पूर्वीचे धोकादायक वळण आहेत ते कमी होतील, अशी
अपेक्षा होती परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊनही अनेक ठिकाणी धोकादायक वळण कायम आहेत. पिंपरी ते नळगीर, एकुरका पाटी, तिरुका, कोळनूर, पाटोदा (बु), जळकोट शहरातील महात्मा फुले चौक, शिंदगी फाटा, दिग्रस (बु) , दिग्रस (खु), हरबळ, गऊळ, फुलवळ, संगूची वाडी, कलंबर बु, उस्माननगर, पिंपरी, नावंदी पाटी आदी ठिकाणी वळण रस्ता कायम आहे. यामधील अनेक ठिकाणे असे आहेत की या ठिकाणी गाडीचा वेग कमी न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना धोकादायक वळण कमी केले असते तर चांगले झाले असते, अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis