
लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)। निलंगा शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागात रविवारी दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः आंबा, ज्वारी पिकांसह इतर शेतीपिकांवर या पावसाचा गंभीर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून परिसरात तीव्र उन्हाचा तडाखा जाणवत आहे. दिवसभर कडक ऊन आणि रात्री उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक सावलीचा आधार घेत असून, अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर उन्हाचा कडाका कायम असतानाच दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात ढग दाटून आले आणि निलंगा शहरासह तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी ढगाळ वातावरण इतके दाट झाले की, दुपारच्या वेळीच संध्याकाळसदृश अंधार पसरल्याचे पाहायला मिळाले. व संध्याकाळपर्यंत ढगाळ व अंधार सदृश वातावरण होते. या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंबा, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले असून इतर पिकांनाही फटका बसला आहे. आधीच विविध नैसर्गिक संकटांचा सामना करणारा शेतकरी आता पुन्हा अस्मानी संकटात सापडल्याची भावना व्यक्त करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis