जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओनपो शेरिंग यांनी दिली भेट
छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)। जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओनपो शेरिंग यांनी भेट देत येथील अद्वितीय कला, इतिहास आणि निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यांचे अजिंठा परिसरात आगमन झाले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीन
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)। जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भूतानचे गृहमंत्री लिओनपो शेरिंग यांनी भेट देत येथील अद्वितीय कला, इतिहास आणि निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यांचे अजिंठा परिसरात आगमन झाले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लेणी क्रमांक १, २, ५, ९, १०, १२, १६, १७ आणि २६ यांचे सविस्तर अवलोकन केले.

अजिंठा लेणीतील भित्तिचित्रांची मोहकता, रंगछटांची सूक्ष्मता आणि प्राचीन कलाकारांच्या कल्पकतेचा अप्रतिम आविष्कार पाहून ते विशेष प्रभावित झाले. शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांद्वारे साकारलेली चित्रशैली आजही तितकीच जिवंत भासते, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दगडात कोरलेली सूक्ष्म शिल्पकला, बुद्धमूर्तींची शांत मुद्रा आणि स्थापत्यकलेतील अचूकता यामुळे लेणींचा प्रत्येक कोपरा इतिहासाची साक्ष देताना दिसतो.

गाईडने त्यांना अजिंठा लेणीतील चित्रशैली, शिल्पकला आणि बौद्ध धर्माशी संबंधित जातक कथांचे सविस्तर विवेचन केले. चित्रांमधून उलगडणाऱ्या जातक कथा, त्यातील भावभावना आणि जीवनमूल्यांचा संदेश याने गृहमंत्री शेरिंग भारावून गेले. हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून निसर्ग आणि कलेचा अद्वितीय संगम असल्याची भावना भूतानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande