
अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.)
बालकांचा मोफत व सक्तीच्याशिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांसाठीची सोडत (लॉटरी) सोमवार, ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. यामध्ये प्राप्त झालेल्या ७,९५३ अर्जामधून २,६२६ पाल्यांचे लॉटरी निघणार असल्याने त्यामुळे या प्रक्रियेची पालकांना उत्सुकता लागली आहे.
जिल्ह्यात आरटीई प्रवेशाकरिता २२७शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांच्या प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज बोलाविण्यात आले होते. याकरिता ३१ मार्च ही शेवटची तारीख होती. त्यामुळे आता प्राप्त झालेल्या ७,९५३ अर्जामधून जिल्ह्याकरिता २६२६ रिक्त जागांकरिता सोडतद्धारे निश्ड केली जाणार आहे. ही सोडत ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजतापासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे सुरू होणार आहे. तिचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर संबंधित अधिकाऱ्यांनी या सोडतीस ऑनलाईन उपस्थित राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर नशिबवान ठरलेल्या पाल्यांच्या पालकांना मोबाईल संदेशाद्धारे माहिती देऊन प्रत्यक्षात प्रवेशाला सुरूवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २६२६ पाल्यांची लॉटरी द्वारे निवड करून २६२६ पाल्यांची प्रतिक्षा यादी देखील तयार केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील पाल्यांनी प्रवेश न केल्यास प्रतिक्षा यादीतील पाल्यांना संधी दिल्या जाणार आहे. त्यामुळे या लॉटरी प्रक्रियेबाबत उत्सुकता लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी