महापौर श्रीचंद तेजवाणी यांची स्वच्छता आढावा बैठक
अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी झोन क्र. २ मधील सभागृहात साफसफाई संदर्भात बिटप्यून कर्मचाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक घेतली. शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक परिणामकारक आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या दृ
महापौर श्रीचंद तेजवाणी यांची स्वच्छता आढावा बैठक


अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.)

अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी झोन क्र. २ मधील सभागृहात साफसफाई संदर्भात बिटप्यून कर्मचाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक घेतली. शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक परिणामकारक आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.बैठकीच्या सुरुवातीला शहरातील विविध प्रभागांतील स्वच्छतेची सद्यस्थिती, कचरा संकलनाची नियमितता, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई तसेच नालेसफाईची प्रगती यांचा आढावा घेण्यात आला. अनेक भागांत स्वच्छतेचे अद्यापही त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. यावर महापौरांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी स्पष्ट केले की, शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक कर्मचारी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. बिटप्यून कर्मचाऱ्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्रात नियमित उपस्थित राहून सफाई कामगारांकडून काटेकोरपणे साफसफाईची कामे पार पाडावीत, तसेच कचरा वेळेवर उचलला जाईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.यावेळी नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही आढावा घेण्यात आला. काही भागांत कचरा वेळेवर न उचलला जाणे, नाल्यांमध्ये साचलेला कचरा, तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता यांसारख्या समस्या समोर आल्या. या सर्व तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेश महापौरांनी दिले.तसेच, स्वच्छता मोहिम अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शहरात नियमित स्वच्छता ड्राईव्ह, जनजागृती मोहीम तसेच नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वच्छ शहर, सुंदर शहर या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.बैठकीत स्वच्छता व्यवस्थेत तांत्रिक सुधारणा करण्यावरही चर्चा झाली. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, कचरा व्यवस्थापनातील नव्या पद्धती तसेच कामकाजातील पारदर्शकता वाढविण्यासाठी डिजिटल प्रणालींचा अवलंब करण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले.याशिवाय, बिटप्यून कर्मचाऱ्यांच्या अडचणी, कामाच्या वेळा, साधनसामग्रीची उपलब्धता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.सदर प्रभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बिटप्यून कर्मचाऱ्यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.या बैठकीस वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, स्वास्थ अधिक्षक विजय बुरे तसेच बिटप्यून कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande