
अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.)।
शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम मुख्यमंत्री १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यस्तरीय मूल्यमापनात अमरावती महानगरपालिकेने २९ महानगरपालिका मधून पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, विदर्भ व मराठवाडा विभागातून या मानाच्या यादीत स्थान मिळवणारी अमरावती महानगरपालिका ही एकमेव संस्था ठरली आहे. सदर स्पर्धेमध्ये आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल व्हाट्सअप चॅटबोट महानगरपालिकेचे संकेतस्थळ, “माय अमरावती अँप”, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) अंतर्गत सेवांचे डिजिटायझेशन व नवीन वेब पोर्टल्सची निर्मिती, माननीय मुख्यमंत्री डॅशबोर्ड सोबत इंटिग्रेशन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ,ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे परवाने व प्रमाणपत्रांची पडताळणी, GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश आहे. मर्यादित संसाधनांमध्ये ही मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा करत ई गव्हर्नन्स मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संगणक विभाग प्रमुख सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे व त्यांच्या चमूचे प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला व उल्लेखनीय कामाबद्दल कौतुक करून पुढील भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. पुढेही नागरिक केंद्रित डिजिटल सेवा देण्याकरिता प्रयत्न करत राहू अशी आशा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी