
अकोला, 30 एप्रिल (हिं.स.)।
पावसाळा सुरू होण्यास केवळ एक महिना शिल्लक असल्याने अकोला शहरातील 144 मोठ्या नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक व भाजप प्रसिद्धीप्रमुख गिरीश कुमार जोशी यांनी केली आहे.
जोशी म्हणाले, मनपा आयुक्त, महापौर व सभापती यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सफाई मोहिमेला गती द्यावी. राज्यात इतरत्र नाले सफाई अभियान सुरू झाले असून अकोल्यात मात्र अद्याप कामाला वेग आलेला नाही.
या भागात पाणी साचण्याची समस्या!
मोठी उमरी, गीता नगर, शिवसेना वसाहत, डाबकी रोड, रणपिसे नगर, अकोट फाईल, न्यू तापडिया नगर, खरप परिसर, दुर्गा चौक, खडकी या भागांमध्ये पावसाळ्यात घरांमध्ये व रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
हद्दवाढ भागाचाही समावेश करा!
शहरातील हद्दवाढ क्षेत्रासह अकोला महानगरात एकूण 144 नाले आहेत. या सर्व नाल्यांच्या सफाईकडे 7 जूनपूर्वी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी जोशी यांनी केली.
सकाळीच राबवा मोहीम
अकोल्यात सध्या उष्णतेची लाट आहे. कामगारांच्या आरोग्याचा विचार करून नाले सफाई मोहीम पहाटे किंवा सकाळच्या वेळेत राबवावी, असेही जोशी यांनी सुचवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे