
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला प्रखर विरोध
अकोला, 30 एप्रिल (हिं.स.) :
अनुसूचित जातींचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी आयोजित करण्यात आले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप आणि संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार हे आंदोलन पार पडले. यामध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
यापूर्वी 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत आता राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
आजच्या आंदोलनाचे नेतृत्व अकोला जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी केले. यावेळी गजानन भटकर, रामभाऊ उंबरकर, प्रतिभाताई शिरभाते, सुनिल झेड गवई, संज्योती मागे, शिवलाल इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला, युवक व विविध शाखांतील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलकांनी शासनाने प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी करत आपला विरोध नोंदवला.
या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे