
कोल्हापूर, 30 एप्रिल (हिं.स.) :
शिरोली गावातील दोन तरुणांशी संबंधित गंभीर कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या तपासासाठी भाजप नेते व राज्यसभा खासदार किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यात भेट दिली. त्यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन हातकणंगले आणि शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या तपासाची माहिती घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर सोमय्या यांनी शिरोली पुलाची गावात जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात स्थानिक ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सांगितले की संबंधित तरुणांचे पाणी, वीज कनेक्शन तसेच शेतातील पाणीपुरवठा देखील बंद करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांची पूर्ण कोंडी करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, अशा प्रकारांमागे कार्यरत असलेल्या नेटवर्कचा शोध घेणे आवश्यक आहे. आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि पाठीशी कोण आहे याचा तपास व्हावा, असेही त्यांनी म्हटले. दोषींना 15 ते 20 वर्षांची कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की राज्यातील विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असून यामागे संघटित गट कार्यरत असल्याचा संशय आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी अधिक गतीने आणि सखोल चौकशी करावी, तसेच नागरिकांनी विशेषतः तरुणी व महिलांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस तपास सुरू आहे.-------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar