
लातूर, 30 एप्रिल (हिं.स.) :उदगीर येथे मार्च 2024 मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) आवश्यक पदनिर्मिती, स्वतंत्र इमारत बांधकाम तसेच प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
मुंबईतील मंत्रालयात झालेल्या भेटीदरम्यान या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उदगीर व परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने व करसंकलन यांसारख्या सेवांसाठी दूरच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे स्थानिक पातळीवर पूर्ण क्षमतेचे कार्यालय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या मागणीला मुख्यमंत्री फडणवीस आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पदनिर्मिती प्रक्रिया, मनुष्यबळ उपलब्धता आणि इमारत बांधकामाबाबत लवकरात लवकर पावले उचलली जातील, असेही आश्वासन देण्यात आले.
या निर्णयामुळे उदगीर व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. यामुळे वेळ व खर्चाची बचत होऊन प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis