
अकोला, 30 एप्रिल (हिं.स.) :
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली असून अकोला जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रीतील अनियमितता समोर आल्याने तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच पाच केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत सुनावणीदरम्यान समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यामुळे पुढील केंद्रांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे:
अकोट जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी फॅक्टरी लि.,अकोट – 2 महिने निलंबन
जयेश ॲग्रो सेंटर,चोहट्टा बाजार (ता. अकोट) – 2 महिने निलंबन
तायडे ॲग्रो सेंटर,आलेगाव (ता. पातूर) – 1 महिना निलंबन
जिल्हा व तालुका स्तरावरील भरारी पथकांनी केलेल्या अचानक तपासणीत एकूण 8 कृषी केंद्रांमध्ये नियमभंग आढळून आला होता. यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र न दर्शवणे, गोदाम व मशीनमधील साठ्यात तफावत, शेतकऱ्यांना पक्की बिले न देणे तसेच साठा व दरफलक अद्ययावत न ठेवणे अशा त्रुटी समोर आल्या.
या प्रकरणांवर सुनावणी घेऊन प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून इतर पाच केंद्रांना भविष्यात नियमांचे पालन करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले असून कोणत्याही प्रकारचा काळाबाजार किंवा लिंकिंग करू नये, असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे