
अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.)
शहरात आज बच्चू कडू यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. प्रहार चे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली तसेच पेढे व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. या वेळी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली.अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर झालेल्या या जल्लोषात कार्यकर्त्यांनी “आम्ही मुळचे शिवसैनिकच आहोत” असा ठाम विश्वास व्यक्त केला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना अधिक मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.यावेळी बच्चू कडू यांचे खंदे कार्यकर्ते बल्लू जवंजाळ यांनी सांगितले की, प्रहारचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या विचारांशी निष्ठावान असून आगामी काळात संघटना अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने काम केले जाईल. या जल्लोषामुळे शहरात राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी