
परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात आली आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच मधपाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
मधमाशीपालन क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यापैकी एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये व तृतीय ५ हजार रुपये अशी आहे.
२० मे २०२६ रोजी ‘जागतिक मधमाशी दिना’निमित्त पुणे येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नामांकनासाठी आवश्यक अर्ज व अधिक माहिती मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रत्येक जिल्ह्यातील खादी मंडळाच्या कार्यालयातही अर्ज मिळू शकतात.
इच्छुकांनी आपली नामांकने ४ मे २०२६ पूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामोउद्योग अधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय (दूरध्वनी : ०२४५२-२२०४१०) तसेच संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर (दूरध्वनी : ०२१६८-२६०२०४) यांच्याशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis