
रत्नागिरी, 30 एप्रिल, (हिं. स.) : चिपळूण येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ ते ३ आणि ६ मे २०२६ या चार दिवसांत विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, क्रीडा व वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल यांनी दिली.
गुरुवारी, दि. १ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्रीकृष्ण सभागृह, उघडा मारुतीजवळ, पाग-चिपळूण येथे महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. कलारत्नग्रुप निर्मित कलारंग स्टुडिओ २३ हर्षद चव्हाण आणि स्टेपर्स ग्रुप महेश पवार यांची नृत्यशृंखला व नृत्यमल्हार अकादमी, चिपळूण प्रस्तुत ‘पुष्पांजली’ हा नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संचालन सौ. आर्या परेश चितळे (कथ्थक नृत्यालंकार) करणार आहेत.
शुक्रवार, दि. २ मे रोजी कलांगण चिपळूण प्रस्तुत युवा स्पंदन या विनोदी प्रहसनाचा सहावा प्रयोग रंगणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांची मुलाखत योगेश बांडागळे घेतील. त्यानंतर युवा स्पंदन कार्यक्रम सादर होईल.
रविवार, दि .३ मे रोजी रात्री ९ वाजता कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल, चिपळूण येथे जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांची पारितोषिके तसेच आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. इतर वैयक्तिक पारितोषिके व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
बुधवार, दि. ६ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता कै. कमलाकरशेठ चितळे व्याख्यानमालेअंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रंगमंच, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी, चिपळूण येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ‘राष्ट्रपुरुषांचे आदर्श-नव्या पिढीची जबाबदारी’ या विषयावर प्रा. नितीन बानगुडे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
या चारही दिवसांच्या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्र दिनाचा उत्साहात आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल, कार्याध्यक्ष रमण डांगे, सचिव प्रभंजन पिंपुटकर व खजिनदार चंद्रशेखर सावले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी