लातूरमध्ये वाहतूक शिस्तीसाठी अतिक्रमण हटवण्याच्या सूचना
लातूर, 30 एप्रिल (हिं.स.) : लातूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, तसेच सर्व संबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यां
अमित देशमुख


लातूर, 30 एप्रिल (हिं.स.) : लातूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, तसेच सर्व संबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.

लातूर महानगरपालिकेत आयोजित बैठकीत आ. देशमुख यांनी खा. डॉ. शिवाजी काळगे, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर डॉ. स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव व उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.

उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांमुळे शहरात सध्या वाहतूक कोंडीच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्येवर तातडीने उपाययोजना करत सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच, वाहतूक समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवण्यावर त्यांनी भर दिला.

शहरातील शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने आणि निवासी संकुलांमध्ये पार्किंग व्यवस्था अनिवार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले. भविष्यातील नियोजनासाठी शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

याशिवाय, शहरातील प्रदूषण पातळी कमी ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, तसेच कचरा व्यवस्थापनात सुधारणा करत कचऱ्याचे ढीग होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यावरही त्यांनी भर दिला.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande