
छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल (हिं.स.)। राज्यात दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकरी बांधव-भगिनींनी तात्काळ ओळखपत्राची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यात एकूण 1 कोटी 71 लाख खातेदार संख्या असून, त्यापैकी 1 कोटी 32 लाख शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विलंब न करता आपला तो तयार करून घ्यावा, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
या नोंदणीसाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात. तसेच शेतकरी स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे आदी प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव-भगिनींनी 20 मेपूर्वी फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या नोंदणीसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास विभागनिहाय हेल्पडेस्कशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी शीतल कौदरे (मो. 9172319637) यांच्याशी संपर्क साधावा.
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis