
बीड, 30 एप्रिल (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त, १ मे २०२६ रोजी बीड येथील पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सकाळी ८:०० वाजता हे ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बीडच्या पालकमंत्रिपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे आली होती. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी मंत्रालयातूनच बैठका घेतल्या होत्या. मात्र, मंत्री झाल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्यात येत असल्याने जिल्हावासीयांमध्ये मोठा उत्साह आहे. अजित पवार यांनी बीडसाठी पाहिलेली स्वप्ने आणि अपूर्ण राहिलेले महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सुनेत्राताई ठोस पावले उचलतील, अशी आशा बीडकरांना आहे.
या सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपजिल्हाधिकारी शैलेश
सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. ध्वजारोहण वेळेबाबत प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून, अन्य कार्यालयांनी सकाळी ७:१५ पूर्वी किंवा मुख्य सोहळ्यानंतर ९:०० वाजेनंतर ध्वजारोहण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis