आय-पॅकचे संचालक विनेश चंडेल यांना दिलासा, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाकडून जामीन मंजूर
नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.)दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आय-पॅकचे संचालक विनेश चंडेल यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध न केल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित बन्सल
दिल्ली पटियाला हाऊस कोर्ट संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.)दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आय-पॅकचे संचालक विनेश चंडेल यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध न केल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित बन्सल यांनी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.

विनेश चंडेल यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सुनावणीदरम्यान सांगितले की, ईडीला जामीन अर्जाला विरोध करण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती, परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४५ अंतर्गत असलेल्या दोन्ही अटी लागू होणार नाहीत. त्यानंतर न्यायालयाने चंडेल यांच्या जामिनावर सुटकेचे आदेश दिले.

चंडेल यांना अटक केल्यानंतर, ईडीने त्यांना १३ एप्रिल रोजी रात्री उशिरा न्यायालयात हजर केले. ईडीच्या म्हणण्यानुसार, मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत चौकशी सुरू असलेल्या 'पीएसी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीमध्ये विनेश चंडेल यांची ३३% हिस्सेदारी आहे. दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात एफआयआर दाखल केला होता.

या प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा ईडीने आय-पॅकचे संचालक प्रतीक जैन यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी छापा टाकला. आय-पॅक तृणमूल काँग्रेसच्या प्रसिद्धीचे काम पाहत होती. ईडीने कथित कोळसा घोटाळ्याच्या तपासासाठी ही धाड टाकली. ईडीचा दावा आहे की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तपासात अडथळा आणण्याच्या प्रयत्नात, धाडीदरम्यान आय-पॅक (I-PAC) कार्यालयात प्रवेश करून काही कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सोबत नेले. ममता बॅनर्जी यांनी नंतर हे आरोप फेटाळून लावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande