रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ज्ञानमंथन
रायगड, 30 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींसाठी ‘जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कामकाज’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून, राय
रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ज्ञानमंथन


रायगड, 30 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींसाठी ‘जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कामकाज’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून, रायन फाऊंडेशन आणि ‘राटा’तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शनिवार, २ मे रोजी अलिबाग येथील होरायझन सभागृहात ही कार्यशाळा पार पडणार असून, ती दोन सत्रांमध्ये होणार आहे. उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाडकरी उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेत माजी आयएएस अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि यशदा येथील निवृत्त अधिकारी एन. टी. देशले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्थान व महत्त्व, आर्थिक नियोजन व अर्थसंकल्प, तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी रोहयो मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाडकरी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच रायगडचे पोलिस अधीक्षक आँचल दलाल उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले सदस्य, सभापती, नगरसेवक आणि सरपंच यांच्यासाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार असून, इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande