लातूर सिटीबस सेवेत नवा मार्ग सुरू; गंजगोलाई–बाभळगाव दरम्यान १९ फेऱ्या
लातूर, 30 एप्रिल (हिं.स.) : लातूर महानगरपालिका परिवहन विभागामार्फत शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी सिटीबस सेवा अधिक विस्तारण्यात आली असून, गंजगोलाई ते बाभळगाव या नव्या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. या मार्गावर दररोज सुमारे १९ फेऱ्या होणार असून, त
सिटी बस


लातूर, 30 एप्रिल (हिं.स.) : लातूर महानगरपालिका परिवहन विभागामार्फत शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी सिटीबस सेवा अधिक विस्तारण्यात आली असून, गंजगोलाई ते बाभळगाव या नव्या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. या मार्गावर दररोज सुमारे १९ फेऱ्या होणार असून, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.

महापालिकेच्या २१ बसेस सध्या शहराच्या चारही दिशांना विविध मार्गांवर धावत आहेत. बार्शी रोडवरील १२ नंबर पाटीपर्यंत, आंबाजोगाई रोडवरील एमआयटी मेडिकल कॉलेज, नांदेड रोडवरील भातांगळी, औसा रोडवरील गंगापूर तसेच खंडापूर आणि धनेगावपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे.

शहरातील सिटीबस सेवेद्वारे दररोज सरासरी १०,००० प्रवासी प्रवास करतात. विशेष म्हणजे महिलांसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध असल्यामुळे दररोज सुमारे ५,००० ते ६,००० महिला या सेवेचा लाभ घेत आहेत, ज्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.

नवीन गंजगोलाई–बाभळगाव मार्गामुळे विवेकानंद चौक, आरटीओ कार्यालय आणि बाभळगाव परिसरातील नियमित प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गावर सोमवारपासून सिटीबसच्या नियमित फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, परिवहन विभागामार्फत विविध कामांचे नियोजन सुरू असून, भविष्यात आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन सभापती फैसलखान कायमखानी यांनी दिली.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande