
लातूर, 30 एप्रिल, (हिं.स.)। लातूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची बहुमताने सत्ता स्थापन झाल्यानंतर, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजाचा अधिकृत श्रीगणेशा केला आहे. काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री. विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले आणि परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी यांनी माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी महापालिका दालनातून जनसेवेचे कामकाज सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महापालिकेला भेट दिली.
यावेळी आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे, महापौर जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांच्यासह नवनियुक्त तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या दालनास भेट देऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे महापालिकेच्या कामकाजात नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विकासाला मिळेल नवी चालना
या प्रसंगी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, लातूर महानगरपालिकेत अनुभवी आणि जनसामान्यांशी नाळ असलेल्या नेतृत्वाकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लातूर शहराच्या सर्वांगीण विकासाला आणि प्रलंबित प्रश्नांना मोठी चालना मिळेल.
यावेळी महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक आणि काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर तिन्ही पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis