आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल (हिं.स.) सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विशेष प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे छत्रपती संभाजीनगर, ज
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल (हिं.स.) सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विशेष प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या (ST) मुला-मुलींना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

यासाठी,विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत असावे, विद्यार्थ्याचे पालक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावेत. या योजनेत आदिम जमातीचे विद्यार्थी, विधवा, घटस्फोटित, निराधार आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पालकांच्या पाल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. निवड केलेल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे.

प्रवेशासाठी जातीचा दाखला (साक्षांकित प्रत), उत्पन्नाचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याने दिलेला), आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट साईज फोटो,जन्म तारखेचा पुरावा, वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र.पालकांचे संमतीपत्र. दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याचे प्रमाणपत्र व अनुक्रमांक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

प्रवेशासाठीचे कोरे अर्ज आदिवासी प्रकल्प कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. इच्छुक पालकांनी परिपूर्ण भरलेले अर्ज २५ मे २०२६ पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे जमा करावेत, इंग्रजी माध्यमाच्या निवासी मोफत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande