
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर ; हेड अँड नेक कॅन्सर जागरूकता महिन्यानिमित्त आयोजन
नाशिक, 30 एप्रिल (हिं.स.) - एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे मे महिन्यात तोंडाच्या कॅन्सरच्या लवकर निदानासाठी आणि जनजागृतीसाठी महिनाभर तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तंबाखूचे सेवन करणारे किंवा तोंडात जखमा, लाल किंवा पांढरे डाग यांसारखी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतामध्ये हेड अँड नेक कॅन्सरचे प्रमाण वाढत असून त्यामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण सुमारे ६२ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर “स्पर्श करा, पाहा, कृती करा” या सोप्या सवयीद्वारे दर महिन्याला दोन मिनिटे स्वतःची तपासणी करण्याचे आवाहन रुग्णालयाचे संचालक डॉ. राज नगरकर, डॉ. विजय पालवे, डॉ. राजेंद्र, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. मोहसीना हुसेन, डॉ. कौस्तुभ कुमार, डॉ. अमित भावलकर आणि डॉ. उल्केश पाटील यांनी केले आहे.“तोंडाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी दोन मिनिटांची कृती” ही मोहीम मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेडतर्फे सुरू करण्यात आली असून ऍक्ट अगेन्स्ट ओरल कॅन्सर या उपक्रमाला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.नगरकर म्हणाले की, निदानासाठी विविध तपासण्या आणि बायोप्सीचा वापर केला जातो, तर उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, किरणोपचार, रसायनोपचार आणि काही प्रकरणांमध्ये प्रतिकारशक्ती वाढविणारी उपचारपद्धतीचा समावेश होतो. तंबाखू सोडणे आणि एचपीव्ही लसीकरण महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. १ मे ते ३१ मे दरम्यान हेड अँड नेक विभागात तोंडाच्या कॅन्सरची मोफत तपासणी केली जाणार आहे. लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि दर महिन्याला दोन मिनिटे स्वयं-तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
न भरून येणारी जखम, तोंडातील अल्सर, सतत घसा दुखणे, गिळताना त्रास, आवाजात बदल, मान किंवा जबड्यात सूज ही सुरुवातीची लक्षणे आहेत. सुमारे ८० ते ८५ टक्के प्रकरणे तंबाखूशी संबंधित आहेत. अनेक रुग्ण उशिरा निदानासाठी येत असल्याने उपचार अधिक कठीण होतात. पुरुषांमध्ये प्रमाण जास्त असले तरी तंबाखू न वापरणाऱ्यांमध्येही वाढ दिसून येत आहे.डॉ. राज नगरकर, संचालक एच सी जी रुग्णालय
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV