परभणी - थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी १ ते ८ मे कालावधीत “संकल्प सप्ताह”
परभणी, 30 एप्रिल, (हिं.स.)। दि. ८ मे जागतिक थॅलेसेमिया दिवसाचे औचित्य साधून “थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान”च्या वर्षपूर्ती निमित्ताने राज्यात १ ते ८ मे २०२६ या कालावधीत संकल्प सप्ताहराबविण्याची सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्
Q


परभणी, 30 एप्रिल, (हिं.स.)। दि. ८ मे जागतिक थॅलेसेमिया दिवसाचे औचित्य साधून “थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान”च्या वर्षपूर्ती निमित्ताने राज्यात १ ते ८ मे २०२६ या कालावधीत संकल्प सप्ताहराबविण्याची सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

संकल्प सप्ताहाच्या अनुषंगाने येथील आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाची घेण्यात आलेल्या बैठकीत बोर्डीकर बोलत होत्या.

“एक पाऊल थालेसेमिया मुक्तीकडे अभियान” हे राज्यातील महत्वकांक्षी व लोककल्याणकारी मोहीम असून दिनांक ८ मे रोजी या अभियानास एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने राज्यभर प्रभावी जनजागृती, तपासणी व समुपदेशन वाढविण्याच्या उद्देशाने राज्यात संकल्प सप्ताह राबविला जाणार आहे.

या सप्ताहाच्या माध्यमातून व्यापक लोकसहभाग निर्माण करून थॅलेसेमिया प्रतिबंधाला गती देणे हे मुख्य उद्देश असून याकरीता संकल्प सप्ताहराबविण्यात येणार असल्याचे या अभियानाचे राज्य समन्वक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सांगितले.

आठवड्याभरात व्यापक लोकसहभाग वाढवण्यासाठी व जनजागृती करीता आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. पहिल्या तिमाहीतील गर्भवती मातांची थॅलसेमिया मायनर तपासणी व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन व स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

जिल्हा, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना येथे तपासणी व समुपदेशन करण्यात येणार आहे. दि. ८ मे रोजी जिल्हास्तरावर जागतिक थॅलसेमिया दिवस साजरा करण्यात येणार आहे.

परभणीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार व जिल्हा आरोग्य अधिकारी संजयकुमार पांचाळ यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात संकल्प सप्ताह राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

*या सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम आणि संकल्पना--*

१ मे – जिल्हास्तरावर संकल्प दिवसाचे उदघाटन व साजरा करणे, आरोग्य संस्थांमध्ये थॅलेसेमिया निर्मूलनाची शपथ घेणे आणि डिजिटल कॅम्पेनची सुरुवात केली जाईल.

२ मे – शाळा व महाविद्यालय जनजागृती (Theme: Test Before Marriage), विविध स्पर्ध, परिसंवाद, चर्चासत्राचे आयोजन करणे. तरुणांमध्ये लग्नापूर्वी तपासणीची गरज पटवून देण्यासाठी व्याख्याने आयोजित केली जातील.

३ मे – आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण (Theme: Capacity Building): आशा, ANM आणि MPW यांना लवकर निदानासाठी आणि फील्ड-लेव्हल रिपोर्टिंगसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

४ मे – गर्भवती महिला व कुटुंब सल्ला (Theme: Healthy Future Generation):ANC क्लिनिकमध्ये गर्भवती मातांचे समुपदेशन आणि हाय-रिस्क जोडप्यांची यादी तयार केली जाईल.

५ मे – रुग्ण सहाय्य व रक्तदान (Theme: Care for Existing Patients):थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष रक्तदान शिबिरे आणि मोफत औषध वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

६ मे – तपासणी (Screening) दिवस (Theme: Know Your Status):१८ ते ३५ वयोगटातील व्यक्ती आणि लग्न ठरलेल्या जोडप्यांची HPLC व CBC तपासणी केली जाईल.

७ मे – जनजागृती रॅली व मीडिया दिवस (Theme: Mass Awareness Movement): जिल्हा व तालुका स्तरावर रॅली काढून प्रसार माध्यमं आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली जाईल.

८ मे – जागतिक थॅलेसेमिया दिन: जिल्हास्तरावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करून आरोग्य मोहिमेचा आढावा घेतला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande