
रायगड, 30 एप्रिल (हिं.स.)। औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) पनवेल येथील निर्लेखित, निरुपयोगी व भंगार साहित्याच्या विक्रीसाठी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. याकरिता जीएसटी नोंदणीकृत भंगार खरेदीदारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुकांनी दिनांक ८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सिलबंद लिफाफ्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्र. प्राचार्य वि. द. टिकोले यांनी केले आहे.
सदर भंगार साहित्य संस्थेच्या विविध विभागांमध्ये ठेवण्यात आले असून, ते ‘जैसे आहे’ त्या स्थितीत निविदा पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये जुन्या व निकामी झालेल्या यंत्रसामग्री, हत्यारे, उपकरणे, फर्निचर, संगणक व संगणक साहित्य, आयटी उपकरणे तसेच एम.एस. स्क्रॅप, ट्यूबपट्टी स्क्रॅप, प्लास्टिक स्क्रॅप, रिकामे टोनर, टायर स्क्रॅप, पेपर रद्दी आदी विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.
निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी संस्थेकडून विहित नमुन्याचा अर्ज रुपये ३०० (न परतावा) भरून घेणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक निविदेसोबत रुपये ३,००० अनामत रक्कम (डीडी स्वरूपात) ‘Registrar, Industrial Training Institute Panvel, Dist-Raigad’ यांच्या नावाने सादर करणे बंधनकारक आहे.
सदर साहित्य पाहणीसाठी २ मे ते ११ मे २०२६ या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत संस्थेत भेट देता येईल. प्राप्त झालेल्या निविदांपैकी जास्तीत जास्त दर देणाऱ्या पात्र जीएसटी धारक खरेदीदारास साहित्य विक्री करण्यात येणार आहे.
सिलबंद निविदा १२ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्राचार्यांच्या दालनात समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. दरम्यान, संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार प्राचार्यांकडे राखीव असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)