
छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.)। केवळ मराठवाडा विभागातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ भागातील कर्करोग रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयाने दर्जेदार व सुलभ उपचार देऊन लौकीक प्राप्त केला आहे. कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांना हे रुग्णालय म्हणजे आशेचा किरण होय. स्थापनेपासून आजपर्यंत लाखो रुग्णांना सेवा देऊन या रुग्णालयाने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे व शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या कुशल नियोजन आणि प्रशासनामुळे येथील सेवांचा दर्जा उंचावला असून रुग्ण बरे होऊन हसऱ्या चेहऱ्याने आपल्या कुटूंबात परत जातात हा त्यांच्या समाधानाचा क्षण असल्याचे डॉ. सुक्रे व डॉ. गायकवाड सांगतात.
कर्करोग आणि त्यावर मात करण्यासाठी रुग्णाला द्यावी लागणारी झूंज ही केवळ रुग्ण आणि आजार यांच्यातील झूंज नसून त्यात उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे योगदान मोठे असते. ते योगदान शासकीय कर्करोग रुग्णालय समर्थपणे देत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,छत्रपती संभाजीनगर ( पूर्वीचे औरंगाबाद ) येथे सन १९८४ मध्ये किरणोपचार विभागाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाच्या पुढाकारातून या रुग्णालयाचा सातत्याने विस्तार होत आज ते अत्याधुनिक सुविधा असलेले महत्त्वाचे कर्करोग उपचार केंद्र बनले आहे.
सन २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाने या रुग्णालयाला मान्यता देत बांधकामास सुरुवात केली. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पुढे सन २०११ मध्ये शासन निर्णयानुसार वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची ३५9 पदे मंजूर करण्यात आली.
दि. २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णालयाचा अधिकृत शुभारंभ झाला. येथे पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, रेडिओ डायग्नोसिस यांसह १०० खाटांची व्यवस्था, ४ शस्त्रक्रिया कक्ष, किमोथेरपी व किरणोपचार सुविधा सुरू करण्यात आल्या. सिटी सिम्युलेटर, ब्रॅकीथेरपी व लीनियर अॅक्सिलरेटर यांसारखी आधुनिक यंत्रसामग्रीही उपलब्ध झाली.
सन २०१५ मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांच्याशी डॉ.कैलास शर्मा, शैक्षणीक संचालक, टाटा रुग्णालय, मुंबई यांच्या समन्वयाने सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत टाटा रुग्णालय मुंबईद्वारे भाभाट्रॉन-II यंत्र देण्यात आले, ज्यामुळे उपचाराची प्रतीक्षा कमी झाली आणि मुंबईकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या घटली.
सन २०१६ मध्ये या रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्था दर्जा मिळाला. पुढे केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने 97 कोटींचा निधी मिळून सुविधांचा विस्तार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती करत २०१८ मध्ये एम.डी. रेडिओथेरपी आणि २०२० मध्ये एम.सी.एच. सर्जिकल ऑन्कोलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.
सन २०२१ पासून डीएम पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी आणि एमआरआय सुविधा सुरू झाली. सन २०२४ मध्ये चार विषयात सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू झाले. २०२५ मध्ये रोबोटिक सर्जरी युनिट, १२८ स्लाइस सी.टी. स्कॅन व पॅलिअटिव्ह मेडिसिन विभाग सुरू करण्यात आला.
दि. २७ एप्रिल २०२५ रोजी विस्तारित इमारतीचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नडडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यामध्ये ३०० खाटा, नवीन आयपीडी वॉर्ड, डे-केअर सुविधा तसेच डिजिटल मॅमोग्राफीची सुविधा सुरू झाली. सध्या रुग्णालयात मेडिकल, सर्जिकल, हेड अँड नेक, गायकॅनोलॉजिकल, पेडियाट्रिक, रेडिएशन ऑन्कोलॉजीसह विविध विभाग कार्यरत आहेत. तसेच ग्रामीण व शहरी भागात कर्करोग जनजागृती व स्क्रिनिंग मोहिमा राबवल्या जात आहेत.
आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना यांसारख्या योजनांमुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रुग्ण व नातेवाईकांसाठी निवास, भोजन व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत.
रुग्णसेवेची ठळक आकडेवारी (२०१२ ते मार्च २०२५)
• ओपीडी रुग्ण: ४.४२ लाख
• आयपीडी रुग्ण: ६३,२९८
• मोठ्या शस्त्रक्रिया: ११,४०४
• लहान शस्त्रक्रिया: ११,३८४
• केमोथेरपी (डे-केअर): १.२४ लाख
• आयसीयू रुग्ण: ९,५३०
• एक्स-रे: ८२,५३८
• सोनोग्राफी: ८८,४७६
या रुग्णालयातील सद्य परिस्थितीतील सोयी सुविधा व भविष्यात प्रिव्हेन्टीव्ह ऑन्कोलॉजी अभ्यासक्रम, मॉलिक्युलर प्रयोगशाळा व बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याकरीता सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये धीरजकुमार, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष आणि संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत मंजूर असलेल्या ७१९ पदांपैकी ५२९ पदे कार्यरत असून १९० पदे रिक्त आहेत. तरीही छत्रपती संभाजीनगर येथील हे शासकीय कर्करोग रुग्णालय मराठवाड्यासह राज्यातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून अत्याधुनिक उपचार, शैक्षणिक प्रगती आणि व्यापक सेवा यामुळे त्याची ओळख अधिक बळकट होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis