अमरावती जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'वर तीन कर्मचाऱ्यांची निवड
अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.) अमरावती जिल्हा परिषदेच्या ''वॉल ऑफ फेम''वर मार्च महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तीन कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक शरद चहाकार, मुख्यालयातील बीम्स प्रणाली सांभाळणारे स्वप्नील
जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'वर तीन कर्मचाऱ्यांची निवड


अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.)

अमरावती जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'वर मार्च महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तीन कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक शरद चहाकार, मुख्यालयातील बीम्स प्रणाली सांभाळणारे स्वप्नील बेंडे आणि बांधकाम विभागाच्या दर्यापूर येथील कार्यालयात कार्यरत उपअभियंता मंगेश पुनसे यांचा समावेश आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांचा मुख्यालयातील कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वोत्कृष्ट कामकाजासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण व्हावी, या उद्देशाने सीईओ महापात्र यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्रशासनाने जानेवारी २०२६ पासून हा उपक्रम सुरू केला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये उत्कृष्ट काम करणारे तीन कर्मचारी 'वॉल ऑफ फेम'चे पहिले मानकरी ठरले होते.ही 'वॉल ऑफ फेम' सीईओंच्या दालनाबाहेर दर्शनी भागात उभारण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत ये-जा करणाऱ्या नागरिकांना गेल्या महिन्यात कोणी उत्कृष्ट काम केले, त्यांचा विभाग कोणता आणि त्यांची जबाबदारी काय होती, याची माहिती सहज मिळते. मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच विभागांमध्ये कामाची घाई असतानाही, चहाकार, पुनसे आणि बेंडे यांनी आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून आपल्या कर्तव्यात वेगळा ठसा उमटवला.

वॉल ऑफ फेम'साठी जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुखांकडून त्यांच्या कामकाजाची माहिती मागवण्यात आली होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा घेऊन या तिघांची निवड करण्यात आली. निवडीनंतर तिघांनाही मुख्यालयी बोलावून सीईओ संजीता महापात्र यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. मंगेश पुनसे काही अपरिहार्य कारणांमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वतीने कनिष्ठ अभियंता जगदीश पानसे यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी अतिरिक्त सीईओ विनय ठमके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड आणि इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शरद महादेवराव चहाकार, वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग, यांनी खाजगी शाळा आस्थापनांचे अभिलेखे संगणकीकृत केले. स्वप्नील बेंडे यांनी बीम्स प्रणालीवर उद्दिष्टानुसार शंभर टक्के ध्येयप्राप्ती केली. तर, दर्यापूर येथील बांधकाम विभागात उपअभियंता असलेले मंगेश पुनसे यांनी गेल्या महिन्यात रस्ते आणि बांधकामसंबंधी समस्यांचे निवारण करण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande