
अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)।
अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातून जाणारा कारंजा ते दर्यापूर राज्य महामार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यालगत असलेले हातपंप, विहीर, विद्युत खांब आणि अतिक्रमणांमुळे हा मार्ग धोकादायक झाला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातून जाणारा कारंजा ते दर्यापूर राज्य महामार्ग सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. या मार्गालगतच चार हापशे, एक विहीर आणि विज वितरण कंपनीचे विद्युत खांब उभे असल्याने रस्ता मोठ्या प्रमाणात अरुंद झाला आहे.
त्यातच नगर परिषदेच्या व्यापार संकुल धारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. या रस्त्यावरून २४ तास जड वाहनांसह शहरातील मोठी वाहतूक सुरू असते. त्यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी याच मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मात्र, इतक्या गंभीर घटनेनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद प्रशासन आणि विज वितरण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात आणखी मोठे अपघात होण्याची
भीती व्यक्त केली जात आहे.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की, प्रशासन आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या समस्येकडे संबंधित विभाग कधी लक्ष देणार?
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे