
रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रत्नागिरी विभागाला १०० बसेस मिळणार आहेत. या बसेस टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील ९ आगारांमध्ये दाखल होणार आहेत.
मुंबईत नुकतेच या नव्या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल होणार आहेत. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ३ बाय २ आसन क्षमता यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
यापूर्वी एसटी महामंडळाने शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा ऐतिहासिक नावांनी बससेवा सुरू करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या माध्यमातून एसटी सेवेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.
जिल्ह्यांतर्गत प्रवास करताना अनेक प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन ३ बाय २ आसनक्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या बसेसमुळे अधिक प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळणार आहे.
या योजनेची सुरुवात नागपूर येथून होणार असून प्रारंभी तेथे ५० बसेस दाखल होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांना बसेस देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात या बसेस लवकरच दाखल होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी