
नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)।
नांदेड शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेल्या 'परशुराम तेजोत्सवा'मुळे शहरात धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक उर्जा संचारली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नांदेडच्या पुढाकारातून १७, १८ आणि १९ एप्रिल या कालावधीत कुसुम सभागृह येथे हा त्रिदिवसीय महोत्सव रंगणार असून, प्रबोधनात्मक व्याख्याने, आध्यात्मिक चिंतन आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार आहे. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित या महोत्सवाबाबत माहिती देताना महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा या महोत्सवाचे संयोजक निखिल लातूरकर यांनी हा उत्सव केवळ धार्मिक नव्हे, तर समाजजागृती आणि सांस्कृतिक ॥ एकात्मतेचा प्रभावी मंच ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. महोत्सवाची सुरुवात शुक्रवार १७ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता होणार असून, प्रसिद्ध व्याख्याते शरद पोंक्षे 'प्रखर हिंदुत्व' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते होणार असून, अॅड. गजानन पिंपरखेडे आणि अश्विनी चौधरी हे निवेदनाची सूत्रे सांभाळतील. शनिवार १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १०:३० या वेळेत दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रम होणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
'प्रत्येक युगातील ब्राह्मण' या विषयावर 'झी मराठी फेम' अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचे व्याख्यान रंगणार आहे. त्यानंतर भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायांवर आधारित 'संभवामि युगे युगे' हा प्रभावी नृत्याविष्कार गुरु सोनाली करंदीकर आणि त्यांच्या नाशिक येथील शिष्यांकडून सादर केला जाणार आहे. रविवार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १०:३० या वेळेत समारोप सोहळा पार पडणार असून, 'परशुरामांची शिष्य परंपरा' या विषयावर काळाराम मंदिर, नाशिकचे महामंडलेश्वर महंत सुधीरदास यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यानंतर 'म्युझिकल स्क्वेअर' प्रस्तुत 'भक्ती संध्या' या सांगीतिक कार्यक्रमात धीरज पोळ, संतोष कुलकर्णी, सुशांत पांडे आणि प्रणीती बिलोलीकर आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत आडे (पुणे) करणार आहेत. याच दिवशी परशुराम चौक, रिंग रोड, काबरा नगर येथे नगरसेवक आशिष नेरलकर, अनिल डोईफोडे, मनीषा कुनसावळीकर, पांडे काका, डॉ. मुकुंद मुळे आणि कुलकर्णी यांच्या पुढाकारातून परशुराम चौकाच्या नाम फलकाचे पूजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'ब्रह्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, डॉक्टर, वकील, उद्योजक आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रांतील योगदानकर्त्यांना 'ब्रह्ममित्र', 'रेणुकाई' आणि 'गोदाई' पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवाला सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शनिवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत साई लॉन्स येथे 'मोफत वधू-वर परिचय मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. सचिन वाडे-पाटील आणि निखिल लातूरकर यांच्या संयोजनाखाली होणारा हा उपक्रम उपवधू-वरांसाठी एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis