

रायगड, 05 एप्रिल (हिं.स.)। नेरळ पाडा येथील रेल्वे फाटक दि. ०६.०४.२०२६ ते १६.०४.२०२६ या कालावधीत बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे हा कालावधी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा असल्याने विद्यार्थी, पालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
फाटक बंद असल्याबाबत सूचना लावण्यात आली असली, तरी पर्यायी मार्गाची कोणतीही प्रभावी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फेरा मारावा लागत असून वेळेत पोहोचणे कठीण होत आहे.
याचबरोबर नेरळ-पेशवाई रोडचीही दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. फाटक बंद आणि खराब रस्ते यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. “एखादा रुग्ण अचानक आजारी पडल्यास रुग्णालयात कसे पोहोचवायचे?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, वारंवार रेल्वे फाटक बंद करून दुरुस्तीची कामे का करावी लागतात? यावर ठोस उपाययोजना का होत नाहीत? तसेच या ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) कधी बांधण्यात येणार, याबाबत प्रशासन किंवा संबंधित यंत्रणा काहीच स्पष्ट का बोलत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच कायमस्वरूपी उपाय म्हणून उड्डाणपूल उभारण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)