

रायगड, 05 एप्रिल (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील पोशीर, शिलार परिसरात प्रस्तावित टोरेन्ट प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक, शेतकरी तसेच निसर्गप्रेमी यांनी एकजूट दर्शवित तीव्र विरोध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत येथे आयोजित बैठकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. या बैठकीची माहिती अॅड. कैलास मोरे यांनी दिली.
बैठकीत उपस्थितांनी कर्जत तालुक्यात वाढत्या प्रकल्पांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. “कर्जतच्या बहुतांश भागात सध्या विविध प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र त्याचा स्थानिकांना कोणताही थेट फायदा होत नाही,” अशी भावना व्यक्त करण्यात आली. वीज प्रकल्पांमधून स्थानिकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्यानेही नाराजी व्यक्त झाली.
कर्जतची स्वच्छ हवा आणि निसर्ग हे येथील प्रमुख वैशिष्ट्य असून, अति विकासामुळे या पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. “मुंबईच्या तुलनेत कर्जतचा हवा निर्देशांक चांगला आहे. मात्र सिमेंटचे जंगल वाढल्यास कर्जतची ओळख धोक्यात येईल,” असे मत नागरिकांनी मांडले.
तसेच, या प्रकल्पांमुळे शेतकरी व भूमिपुत्रांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. स्थानिक लघुउद्योग, शेती व निसर्गावर आधारित व्यवसाय धोक्यात येऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला असून, प्रकल्पांविरोधात पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला, अशी माहिती अॅड. कैलास मोरे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)