
नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)।
माहूर गड येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती गुरू अच्युत भारती महाराज (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
अच्युत भारती महाराज यांच्या पश्चात १९७८ मध्ये वयाच्या ४७व्या वर्षी मधुसूदनजी भारती महाराज यांनी संस्थानच्या ३० व्या महंतपदी विराजमान झाले. तब्बल ४८ वर्षे संस्थानचा कारभार त्यांनी अत्यंत निष्ठेने सांभाळला. बालवयातच संन्यास स्वीकारलेल्या महाराजांनी साधेपणा, आध्यात्मिक चिंतन आणि भक्तिभाव
यांचा आदर्श ठेवत श्री दत्त शिखर संस्थानच्या धार्मिक परंपरा जपल्या तसेच संस्थानच्या विकासालाही चालना दिली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेक संत-महंत व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
प.पू. मधुसूदनजी भारती महाराज यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याची व शिकवणीची प्रेरणा भाविकांच्या मनात कायम राहणार आहे.खा अशोक चव्हाण यांनी सांगितले की,
महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे. त्यांच्या देवाज्ञेमुळे आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. महाराजांनी आपल्या जीवन कार्यात केवळ भक्तीचा मार्ग दाखविला नाही तर सेवा व मानवतेचीही शिकवण दिली. माहूर गडावरील दत्तशिखर संस्थानची आध्यात्मिक परंपरा त्यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने जपली. महाराजांच्या रूपात एक थोर विचारवंत आणि मार्गदर्शक हरपले आहेत. त्यांचे कार्य आणि शिकवण भक्तांच्या माध्यमातून सदैव अजरामर राहील.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis