
बीड, 05 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर केज पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली. सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जयंती उत्सव शांततेत आणि नियमांच्या चौकटीत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत मिरवणुकीत डीजे आणि कर्णकर्कश आवाजावर पूर्णपणे बंदी असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिले आहेत. नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवून मिरवणुकीसाठी सोयीसुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. दारूबंदीची कडक अंमलबजावणी करत महामानवाचे विचार आत्मसात करून सलोख्याने जयंती साजरी करण्याचा निर्णय यावेळी सर्वसंमतीने घेण्यात आला. बैठकीला लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis