
बीड, 05 एप्रिल (हिं.स.)।परळी येथील एका नागरिकाची 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून तब्बल २३ लाख ४२ हजार ८८८ रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बीड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी जळगाव येथून तिघांना अटक करण्यात आली आहे. परळीचे रहिवासी सूर्यकांत मुंडे यांना बनावट पोलीस बनून डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवण्यात आले होते. तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेतला. हे आरोपी फसवणुकीची रक्कम करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने स्वतःच्या खात्यावर वळवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान ३ लाख रुपये रोख जप्त केले असून आरोपींच्या बँक खात्यावरील ३ लाख २० हजार रुपयांची रक्कम गोठवली आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेटमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे याचा तपास बीड पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis