उपचाराच्या नावाखाली अत्याचार; रायगडमध्ये भोंदू बाबाला अटक
रायगड, 05 एप्रिल (हिं.स.)। : उपचाराच्या बहाण्याने विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलिसांनी एका भोंदू बाबाला अटक केली आहे. अब्दुल रशीद उर्फ बाबाजान (रा. कळंबोली, नवी मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूज (मुंबई) येथील एका विवाहित महिलेने वैवाहिक वादाच्या पार्श्वभूमीवर उपाय शोधण्यासाठी संबंधित बाबाचा संपर्क साधला होता. हा आरोपी स्वतःला जादूटोणा व धार्मिक उपचार करणारा असल्याचे सांगत होता. त्याने पीडित महिलेला उपचार करून देण्याच्या बहाण्याने प्रथम तिच्या माहेरी बोलावून घेतले आणि नंतर खालापूर तालुक्यातील महड परिसरातील एका घरात नेले.

तेथे मध्यरात्री काही धार्मिक विधी व काळी जादू करण्याच्या नावाखाली आरोपीने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही वस्तू जमिनीत पुरून तथाकथित उपचार सुरू असल्याचे भासवण्यात आले. मात्र, कोणताही उपचार न होता आपल्यावर अत्याचार झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडित महिलेने खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास रायगडचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल मेहुल यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक सचिन पवार व त्यांच्या पथकाने केला. तपासादरम्यान आरोपीला कळंबोली येथून अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपीविरुद्ध यापूर्वीही मुंबईतील सांताक्रूज पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande