नागपूरमध्ये दोन अल्पवयीन भावंडे बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र
नागपूर, 05 एप्रिल (हिं.स.) : आई-वडील अभ्यास करण्यावरून रागावल्यामुळे नागपुरात 2 अल्पवयीन भावंडांनी घर सोडल्याची धक्कादायक घटना घडली. आदित्य अमित मेश्राम (वय 17) आणि प्रथमेश अमित मेश्राम (वय 12) अशी या भावंडांची नावे असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलि
संग्रहित लोगो


नागपूर, 05 एप्रिल (हिं.स.) : आई-वडील अभ्यास करण्यावरून रागावल्यामुळे नागपुरात 2 अल्पवयीन भावंडांनी घर सोडल्याची धक्कादायक घटना घडली. आदित्य अमित मेश्राम (वय 17) आणि प्रथमेश अमित मेश्राम (वय 12) अशी या भावंडांची नावे असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 4 पथके स्थापन केली आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि प्रथमेश ही दोन्ही भावंडे नागपूरच्या खामला परिसरातील सोमलवार हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. त्यांची आई विनीता मेश्राम या घरकाम करून उदरनिर्वाह करतात, तर वडील पेंटिंगचे काम करतात. कामानिमित्त दोघेही दिवसभर घराबाहेर असतात. घटनेच्या दिवशी आदित्य प्रथमेशला शाळेतून घरी घेऊन आला. त्यानंतर दोघांनी बॅग भरली आणि सायकलवरून घर सोडले. रात्री 8.30 वाजेपर्यंत दोघेही परत न आल्याने आईने शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी 4 वेगवेगळी पथके तयार केली आहेत. एक पथक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे, दुसरे नातेवाईकांकडे चौकशी करत आहे, तर तिसरे पथक परिसरात शोधमोहीम राबवत आहे. गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास सुरू आहे.प्राथमिक तपासात मुलांकडे पैसे नसल्याने त्यांनी सायकल विकण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील भंगार विक्रेत्यांकडेही चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडासे यांनी दिली.अभ्यास करीत नाहीत म्हणून रागावल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेली ही घटना आता गंभीर वळण घेत असून, दोन्ही मुलांचा सुरक्षित शोध लागावा यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande