
अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.) जिल्ह्यातील वाढता उकाडा आणि त्यातच संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ९ ग्रामीण रुग्णालये, ५ उपजिल्हा रुग्णालये, मनपा क्षेत्रात १३ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय असे एकूण ८७ कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा जोर असला तरी आगामी काही दिवसांमध्ये तप्त उन्हाच्या झळा बसणार आहेत. त्यामुळे या दिवसात उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने खबरदारी म्हणून उष्माघात कक्ष स्थापन केला आहे. या वातानुकूलित कक्षामध्ये पाणी, प्राथमिक किट, थंडावा निर्माण करणाऱ्या व्यवस्थेचा समावेश आहे. केंद्र सरकारने याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.प्रत्येक तालुक्याने, प्राथमिक आरोग्य केंद्राने आपला कृती आराखडा तयार करण्याचे त्या सूचनेत नमूद आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे डेथ ऑडिट जिल्हास्तरीय डेथ ऑडिट कमिटीमार्फत नियमित करण्यात यावे. कोणत्याही मृत्यूचे डेथ ऑडिट एक आठवड्याच्या आत करावे, अशाही सूचना आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने उष्माघात कक्ष कार्यान्वित केलेले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी