अमरावतीत महिलांसाठी 'गोट प्रोड्युसर कंपनी'ची स्थापना
अमरावती, 05 एप्रिल, (हिं.स.) अमरावती जिल्ह्यात महिलांच्या उन्नतीसाठी ''गोट प्रोड्युसर कंपनी''मार्फत एक पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) राबवला जाणार आहे. राज्य शासनाच्या कृषी व पशुपालन विभागाने जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि परंपरागत शेती व्यवसाय ल
अमरावतीत महिलांसाठी 'गोट प्रोड्युसर कंपनी'ची स्थापना:जिल्हा परिषद राबवणार राज्य शासनाचा 'पायलट प्रोजेक्ट'


अमरावती, 05 एप्रिल, (हिं.स.) अमरावती जिल्ह्यात महिलांच्या उन्नतीसाठी 'गोट प्रोड्युसर कंपनी'मार्फत एक पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) राबवला जाणार आहे. राज्य शासनाच्या कृषी व पशुपालन विभागाने जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि परंपरागत शेती व्यवसाय लक्षात घेता, येथे बकरीपालनाला मोठा वाव असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट महिलांना सक्षम करणे हे आहे.

या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत चांदूर रेल्वे, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली या चार तालुक्यांमध्ये बकरीपालन केले जाईल. जिल्ह्यात सध्या ३ लाख ४० हजार ६८१ शेळ्या असून, विशेषतः या चार तालुक्यांमध्ये त्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता राज्य शासनाला वाटते.

या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने यासाठी डीआरडीए मार्फत स्थापन झालेल्या महिला बचतगटांची निवड केली आहे. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्रा यांनी या प्रकल्पाची संपूर्ण आखणी केली आहे. त्यांनी सध्याच्या व्यवसायातील उणिवा दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा तयार केली आहे.

शासनाच्या निरीक्षणानुसार, जिल्ह्यात शेळ्यांचे प्रजनन पुरेसे असले तरी बाजाराची उपलब्धता नाही. तसेच, पशुपालकांना पशुसेवा आणि आरोग्य व्यवस्थापनाची पुरेशी माहिती नाही. बहुतेक पशुपालक हा व्यवसाय वैयक्तिक पातळीवर करतात, ज्यामुळे त्यांचे आकलन मर्यादित राहते. या मर्यादांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

'गोट प्रोड्युसर कंपनी' बाजारात स्थिरता आणि मागणी निर्माण करणे, शेतकऱ्यांसाठी आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, पुनरावृत्तीयोग्य मॉडेल तयार करणे आणि मूल्यसाखळी विकसित करणे यावर काम करेल. या कंपनीचे सर्व भागधारक महिला बचतगटाचे सदस्य असतील. सीईओ संजीता महापात्रा यांनी या व्यवसायामुळे जिल्ह्यात येत्या काळात एक वेगळी क्रांती घडेल, असा विश्वास व्यक्त केला.या पायलट प्रोजेक्टसाठी भूमिहीन, अल्पभूधारक आणि पशुधन आधारित उपजीविका असलेल्या कुटुंबांना प्राधान्य दिले जाईल. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (मुंबई) आणि आजीविका (एनआरएलएम - दिल्ली) यांचे सहकार्य मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असून, त्यासाठी भागीदार जोडण्याचे काम सुरू झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande