
छत्रपती संभाजीनगर, 05 एप्रिल (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभागाचे प्रमुख डॉ.शिरीष अंबेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील प्रख्यात जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. अंबेकर यांनी रेखाटलेल्या ३२ चित्रांचे प्रदर्शन येत्या ६ एप्रिल पर्यंत रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे स. प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. शिरीष अंबेकर यांच्या एकूण ३२ कलाकृतींच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जहांगीर आर्ट गॅलरी (नंबर दोन) मुंबई मध्ये सर जे जे डिनोव्हो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हेम चॅटर्जी, ज्येष्ठ चित्रकार प्रकाश भिसे, प्रा. महेंद्र दामले, प्रा. स्मिता किंकरे, कलातज्ज्ञ दिलीप रानडे, शिल्पकार तुषार शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी आर्ट ॲम्बेसीचे प्रशांत वेदक, चित्रकार अनिल नाईक, विलास शिंदे तसेच डॉ. गणेश तरतरे, प्रा. प्रकाश सोनवणे, चित्रकार कुलदीप कारेगावकर, दिग्विजय कुंभार व अन्य चित्रकार मंडळी मोठ्या संख्येने होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे, माजी कलासंचालक राजीव मिश्रा, प्रा. संजय भारती यांनी सदर चित्र प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतींचा आस्वाद घेतला. सदर चित्र प्रदर्शन दिनांक ६ एप्रिलपर्यंत जहांगीर कलादालन मुंबई सर्व रसिकांसाठी ११ ते ७; या वेळेत विनामूल्य खुले राहील. या चित्र प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.शिरीष अंबेकर यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis