
अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.)।
नाफेड अंतर्गत चना खरेदी केंद्रांना काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोंदणी प्रक्रियेची मुदत ३१ मार्च रोजी संपल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना अद्याप टोकन अथवा मेसेज न मिळाल्याने खरेदी प्रक्रियेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टल तसेच प्रत्यक्ष नाफेड कार्यालयात जाऊन नोंदणी केली असली, तरी अनेकांची नोंदणी प्रणालीत दिसत नसल्याची तक्रार आहे. पोर्टलवर केलेली नोंदणी आयडी पुन्हा कार्यालयात नोंद होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नाव खरेदी यादीत समाविष्ट होत नाही. परिणामी, ज्या शेतकऱ्यांना टोकन किंवा मेसेज मिळाले आहेत, त्यांनाच शेतमाल (चना) मोजणीसाठी केंद्रावर बोलावले जात आहे. ३१ मार्चनंतर पोर्टल बंद झाल्याने नवीन शेतकऱ्यांना नोंदणी करता येत नसून, अनेक जण हमीभावाचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. विशेष म्हणजे, नाफेडचा हमीभाव हा व्यापारी बाजारभावापेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात नाफेडकडे आहे. दरम्यान, तूर आणिचना खरेदीला सुरुवात झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपला माल मोजणीसाठी नाफेड केंद्रावर आणला. काहींची मोजणी पूर्ण झाली असली तरी बारदाण्याच्या (गोणपाट) तीव्र टंचाईमुळे खरेदी प्रक्रियेला अचानक ब्रेक लागला. सद्यस्थितीत नाफेड कडे एक गठान म्हणजेच ५०० बारदानाच शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्याच्या माल खरेदी वर विलंब होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणूनही परत जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी