बीड- बर्दापूर आरोग्य केंद्रात पाण्याचा डोह; डॉक्टर आणि रुग्णांचे प्रचंड हाल
बीड, 05 एप्रिल (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत दुरावस्थेत असून अवकाळी पावसामुळे रुग्णालयात अक्षरशः पाण्याचा डोह साचला आहे. या केंद्रांतर्गत २७ गावांतील ५२ हजारांहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची ज
बीड- बर्दापूर आरोग्य केंद्रात पाण्याचा डोह; डॉक्टर आणि रुग्णांचे प्रचंड हाल


बीड, 05 एप्रिल (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत दुरावस्थेत असून अवकाळी पावसामुळे रुग्णालयात अक्षरशः पाण्याचा डोह साचला आहे. या केंद्रांतर्गत २७ गावांतील ५२ हजारांहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असताना छताला लागलेल्या गळतीमुळे डॉक्टरांना चक्क टेबलवर उभे राहून सेवा द्यावी लागली. रुग्णालयाची इमारत खिळखिळी झाली असून कर्मचारी निवासस्थानेही खंडहर बनली आहेत.

आरोग्य केंद्रातील औषधी आणि गोळ्या पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले असून परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रुग्णवाहिकाही भंगार अवस्थेत असल्याने तातडीच्या उपचारासाठी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. प्रशासनाच्या या गंभीर दुर्लक्षामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट असून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande