अमरावती विभागात होणार ‘हायटेक’ एसटी थांबे
अमरावती, 05 एप्रिल, (हिं.स.) - अमरावती विभागातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, ‘लालपरी’चा प्रवास आता अधिक आरामदायी होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, बुलढाणा आ
अमरावती विभागात होणार ‘हायटेक’ एसटी थांबे; १५ कोटींच्या मार्ग निवाऱ्यांना मंजुरी


अमरावती, 05 एप्रिल, (हिं.स.) - अमरावती विभागातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, ‘लालपरी’चा प्रवास आता अधिक आरामदायी होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक ‘प्रवासी निवासी मार्ग निवारे’ उभारण्यासाठी राज्य सरकारने तब्बल १५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळणार असून, एकाच छताखाली आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या आराखड्यानुसार, हे मार्ग निवारे केवळ थांबे न राहता ‘मिनी बस स्थानका’प्रमाणे विकसित केले जाणार आहेत.

अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या चारही जिल्ह्यांतील मुख्य मार्गांसह ग्रामीण भागातील वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकल्प राबवले जातील. आधुनिक वास्तुकला, मजबूत लोखंडी व काँक्रीट रचना आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा यांचा समावेश या निवाऱ्यांमध्ये करण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासनाने एकूण १५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली असून, याचे वाटप चारही विभागांच्या निकडीनुसार केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महामंडळाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामार्फत या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. एमएसआरटीसीच्या अधिकृत निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

प्रवाशांना मिळणार या ‘स्मार्ट’ सुविधा

- बैठक व्यवस्था : प्रवाशांसाठी आरामदायी आणि पुरेशी आसनव्यवस्था.

- स्वच्छता गृहे : महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ प्रसाधनगृहांची सोय.

- पिण्याचे पाणी : शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था.

- माहिती फलक : बसच्या वेळापत्रकासाठी डिजिटल किंवा अद्ययावत माहिती फलक.

- सुरक्षा : रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना.

- हिरकणी कक्ष : स्तनपान करणाऱ्या मातांसाठी स्वतंत्र ‘हिरकणी कक्षाची’ तरतूद काही महत्त्वाच्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande