
बीड, 05 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांविषयी पुनर्गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीची पहिली महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथे पार पडली. या बैठकीत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थित राहून ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. राज्यातील ऊसतोड महिलांच्या अनावश्यक शस्त्रक्रियांवर नियंत्रण मिळवणे आणि त्यांना सुरक्षित आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस धोरण राबवावे, अशी आग्रही भूमिका मुंदडा यांनी यावेळी मांडली.
बैठकीदरम्यान ऊसतोड महिलांच्या आरोग्याचे संरक्षण, अनावश्यक शस्त्रक्रियांवर कडक नियंत्रण आणि ग्रामीण भागातील महिलांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. आमदार नमिता मुंदडा यांनी यावेळी स्पष्ट केले की, महिलांचे आरोग्य ही केवळ त्यांची वैयक्तिक जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण विकासाशी निगडित आहे. प्रत्येक महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आरोग्यदायी जीवन मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलणे काळाची गरज आहे. या विषयावर प्रभावी धोरण तयार करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण शिफारशीही समितीमार्फत शासनाला सादर करण्यात आल्या आहेत.
या विशेष बैठकीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ, बीड जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. विशेषतः बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिलांच्या शस्त्रक्रियांच्या प्रश्नावर यापूर्वीही मोठे वादंग निर्माण झाले होते, त्या पार्श्वभूमीवर या समितीची बैठक आणि मुंदडा यांनी मांडलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महिलांच्या आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ नये आणि त्यांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी या बैठकीत ठोस आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis