
नाशिक, 05 एप्रिल (हिं.स.)।
: नामको बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती करत ४३ कोटी ३३ लाख रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. पुढील वर्षात एकूण व्यवसाय ५१०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी उपाध्यक्ष प्रकाश दायमा, जनसंपर्क संचालक देवेंद्र पटेल, ज्येष्ठ संचालक वसंत गिते, सोहनलाल भंडारी, विजय साने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते. धात्रक यांनी सांगितले की, मागील वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये २८२ कोटी रुपयांची वाढ झाली असून एकूण ठेवी २७२१ कोटींवर पोहोचल्या आहेत. कर्जवाटपातही ३०५ कोटींची भर पडत एकूण कर्जरक्कम १६२७ कोटींवर गेली आहे. त्यामुळे बँकेचा एकूण व्यवसाय ४३४८ कोटींवर पोहोचला असून त्यात ५८७ कोटींची वाढ झाली आहे. सध्या बँकेचा सीडी रेशो ५९.८० टक्के आहे.
बँकेने ७१.७० कोटी रुपयांचा एकूण नफा मिळवला असून सर्व तरतुदी व कर वजा केल्यानंतर निव्वळ नफा ४३.३३ कोटींवर स्थिरावला आहे. विशेष म्हणजे, ग्रॉस एनपीएमध्ये १३.४२ कोटींची घट होऊन तो ४४.७७ कोटींवर आला आहे, जो एकूण कर्जाच्या २.७५ टक्के इतका आहे. निव्वळ एनपीए शून्य टक्क्यांवर राखण्यात बँकेला यश मिळाले आहे.
जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळातही बँकेने प्रभावी गुंतवणूक धोरण राबवल्यामुळे कोणतीही अतिरिक्त तरतूद करावी लागली नसल्याचे धात्रक यांनी नमूद केले. आगामी वर्षात बँकेकडून पाच नवीन शाखा सुरू करण्यात येणार असून त्यापैकी तीन नाशिक शहरात, एक जिल्ह्यात आणि एक राज्याबाहेर असेल. याशिवाय दहा शाखांचे स्थलांतर आणि दहा शाखांचे नूतनीकरण करण्याची योजना आहे.
ग्राहक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी बँक मोबाईल बँकिंगमध्ये नवीन सेवा आणणार आहे. यामध्ये मोबाईलद्वारे मुदतठेव, आवर्ती ठेव (आरडी) आणि खाते उतारा मिळण्याच्या सुविधा उपलब्ध होतील. तसेच स्वतंत्र यूपीआय हँडल सुरू करण्याचाही बँकेचा मानस आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV