
रिक्त ११ सरपंच, ९८ सदस्य पदांसाठी होणार निवडणूक
अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.)।
ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. या जागांसाठी २८ एप्रिलला मतदान होणार असून सात एप्रिलपासून नामांकनास सुरवात होत आहे. जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायतींमधील ९८ सदस्य व ११ सरपंच पदांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावगाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून जिल्ह्यात ६९ ग्रामपंचातींमध्ये ११ थेट सरपंच व ९८ सदस्य, अशा १०९ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २४ फेब्रुवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या या निवडणुका अखेर जाहीर झाल्याने इच्छूक उमेदवार आणि गावपुढाऱ्यांनी राजकीय समीकरणांना प्रारंभ केला आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सात ते १३ एप्रिलदरम्यान (११ व १२ एप्रिल सुटी वगळता) सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत तहसील कार्यालयात नामांकन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून, १७ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १७ एप्रिल रोजीच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल, तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, गावपुढाऱ्यांनी आपापल्या पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी सरपंचपदासाठी चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी